पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष कौतुक.
NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड:- नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या एका सक्रिय टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ७३,७०० रुपयांचा सोन्या-चांदीचा दागिने व रोख रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
•कारवाईचे मार्गदर्शन आणि पथक
ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील आणि नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. साईनाथ पुयड यांनी ही मोहीम राबवली.
या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी इमरान शेख, प्रमोद जोंधळे, बालाजी कदम, संदीप घोगरे, संतोष बेल्लुरोड, महेश बडगु, गोविंद येईलवाड, उमर शेख, सायबर सेलचे पोलीस कर्मचारी राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचा समावेश होता.
•पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक.
या यशस्वी कारवाईबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन इतक्या कमी वेळात गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल आणि चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या कार्यक्षमतेचे आणि टीमवर्कचे जाहीर अभिनंदन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कौतुकामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे मनोबल उंचावले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड आणि त्यांच्या पथकाने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण चौक बायपास रोड परिसरात सापळा रचला होता. या ठिकाणी शेख रेहान ऊर्फ चिल्ला शेख महेबुब (वय २१, रा. मिलतनगर गल्ली नं.३, आणि मोहम्मद रेहान ऊर्फ रिझवान ऊर्फ पुष्पा मोहम्मद इलियास (वय २०, रा. मिलतनगर गल्ली नं.७, व इतर एक आरोपी यांच्यासह एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल मिळून आला. प्राथमिक चौकशीत त्यांनी काही दिवसांपूर्वी मेहुबनगर आणि ओंकारेश्वर नगर येथील दोन बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला माल विकण्याच्या तयारीत असतानाच या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.



