NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील विष्णुपुरी उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याने जनक्षोभ उसळला आहे. उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटी कंपनी ‘के.टी.आय.एल.’ (KTIL) ला तात्काळ ब्लॅक लिस्ट करावे, अशी आक्रमक मागणी ‘मुजीब भाई मित्र मंडळ, नांदेड’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंडळाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
•बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह
सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार आणि तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पुलाचा भाग कोसळणे ही केवळ एक दुर्घटना नसून, तो नियोजित भ्रष्टाचाराचा बळी असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या घटनेमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
•मुजीब भाई मित्र मंडळाच्या प्रमुख मागण्या:
१. उच्चस्तरीय चौकशी: संबंधित कंपनी, जबाबदार अधिकारी व अभियंत्यांच्या भूमिकेची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी.
२. दोषींवर कारवाई: चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिते (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
३. कंपनीला काळ्या यादीत टाका: दोषी आढळल्यास ‘के.टी.आय.एल.’ कंपनीला कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट (Black List) करावे.
४. स्ट्रक्चरल ऑडिट: संपूर्ण उड्डाणपुलाचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करावे.
५. जखमींना मदत: घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थिनींना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई मिळावी.
६. निवारक उपाय: राष्ट्रीय महामार्गावरील सर्व पुलांची गुणवत्ता तपासणी करावी.
•आंदोलनाचा इशारा.
या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने प्रचंड धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब सय्यद जाहेद यांनी दिला आहे.
•शिष्टमंडळाची उपस्थिती.
यावेळी मुजीब भाई मित्र मंडळ नांदेड चे संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब सय्यद जाहेद, गंगाधर वडणे (जिल्हाध्यक्ष), शंकरसिंह ठाकूर (जिल्हा सचिव), प्रमु सावंत (मुख्य सल्लागार/मार्गदर्शक), प्रा. अविनाश नाईक (मुख्य प्रवक्ता), बालाजी जाधव (जिल्हा उपाध्यक्ष), श्यामराव वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष), मारोती शिकारे (जिल्हा कार्याध्यक्ष), रविंद्र सोनकांबळे (सह सचिव), नईम खान (प्रसिद्धी प्रमुख), महेमद बाबा बागवाले (शहर अध्यक्ष), अशोक कांबळे (संघटक), चंद्रकांत कांबळे (सह संघटक), कृष्णा राजमारे (वॉर्ड अध्यक्ष), धर्मदीप सरोदे (सदस्य), के. एस. चौधरी (सदस्य), शेख समीर (शहर उपाध्यक्ष – उत्तर) व शेख रिजवान (जिल्हा उपाध्यक्ष) आदी उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजीनगर), मुख्य अभियंता (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस अधीक्षक, नांदेड यांनाही देण्यात आली आहे.



