NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :यंदा नांदेड शहर व जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणे, तलाव व जलसोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य भीषण पाणीटंचाईचा विचार करता प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे व तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी मुजीब भाई मित्र मंडळ, नांदेड च्या वतीने नांदेडच्या मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे आणि गळती रोखणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे यात म्हटले आहे.
•मंडळाच्या प्रमुख मागण्या:
१. बांधकामांवर तात्पुरते निर्बंध: शहर व परिसरातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन अत्यावश्यक कामे वगळता जून-जुलै २०२७ पर्यंत शासनाच्या धोरणानुसार बांधकामांवर पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास तात्पुरते निर्बंध घालावेत.
२. अवैध रेती उपसा बंद करा: नदीपात्रे व जलस्रोतांजवळ होणारा बेकायदेशीर रेती उपसा तातडीने थांबवून पर्यावरणाचे रक्षण करावे.
३. विष्णुपुरी जलवाहिनीची दुरुस्ती: विष्णुपुरी धरणातून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी व वितरण यंत्रणेचे ऑडीट करून गळती तातडीने रोखावी.
४. बंद बोअरवेल सुरू करा: महापालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या सार्वजनिक बोअरवेलची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित कराव्यात.
५. टँकरने पाणीपुरवठा व नियंत्रण कक्ष: टंचाईग्रस्त व वंचित भागात भेदभाव न करता टँकरने पाणीपुरवठा करावा. तसेच नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करावा.
६. जनजागृती अभियान: पाणी बचत, पुनर्भरण आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने व्यापक मोहीम राबवावी.
संभाव्य पाणीटंचाईची समस्या गंभीर असल्याने प्रशासनाने या मागण्यांचा तातडीने विचार करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब सय्यद जाहेद, प्रभू सावंत (प्रदेश अध्यक्ष), शंकरसिंह ठाकूर (जिल्हा सचिव),मारोती शिकारे (जिल्हा कार्याध्यक्ष),रविंद्र सोनकांबळे (सह सचिव),विजय कुमार उजेडकर (जिल्हा उपाध्यक्ष),शेख रिजवान (जिल्हा उपाध्यक्ष),अशोक प्रधाणे (जिल्हा संघटक), शेख समीर (शहर उपाध्यक्ष उत्तर),डॉ. गौतम कापुरे (सदस्य), केशव सदावर्ते (अर्धापूर तालुका अध्यक्ष), गिरीजा केंद्रें (जिल्हासचिव),शिवाजी सोनकांबळे व मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



