NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड :- कष्टाची आणि प्रामाणिकपणाची जोड दिली की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी यशाला गवसणी घालता येते हे नांदेड महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या मुलाने करून दाखवले आहे. महानगरपालिकेतील कर्मचारी किसन डुकरे यांचे सुपुत्र पंकज किसन डुकरे यांनी अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची थेट मुंबई येथील नामांकित ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स (जे. जे. मेडिकल कॉलेज, मुंबई) येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
• शैक्षणिक पार्श्वभूमी आणि संघर्षमय प्रवास.
पंकज डुकरे यांनी आपली प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड शहरातील बाबा नगर येथील महात्मा फुले हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचे शिक्षण एन. ए. एस. सायन्स कॉलेज, नांदेड येथून पूर्ण केले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही पंकज यांनी कधीही परिस्थितीला आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही. आई-वडिलांनी पाहिलेले डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. तन, मन लावून केलेल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ‘नीट’ (NEET) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत हे यश मिळवले.
• आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक.
महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या किसन डुकरे यांच्या संघर्षाला मुलाच्या या यशाने खरे फळ मिळाले आहे. मुलाने वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली ही मोठी भरारी पाहून डुकरे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पंकज यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नांदेड शहर आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, साप्ताहिक युवा रक्षक ’ परिवाराकडूनही त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश परिसरातील इतर तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.



