NANDED | मुखेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
मुखेड:- तालुक्यातील मुक्रामाबाद येथील शेतकरी बालाजी शंकरअप्पा खंकरे यांच्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या महापुरामुळे त्यांच्या गोठ्यातील ४० म्हशी आणि ४ गायींपैकी काही मृत्युमुखी पडल्या, तर काही वाहून गेल्या. यासोबतच, त्यांचा कष्टाने उभारलेला गोठाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या अनपेक्षित संकटाने खंकरे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे.
या गंभीर परिस्थितीत, हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्याकडे मदतीसाठी आर्त हाक दिली. कोणताही राजकीय पद नसतानाही शेतकऱ्यांच्या दुःखात नेहमीच पुढे असणारे कवळे गुरुजी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
मंत्री मकरंद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करून लवकरच शासनाकडून आर्थिक मदत पोहोचवली जाईल, तसेच पुनर्वसन विभागाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कवळे गुरुजींच्या तत्परतेमुळे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे संकटात सापडलेल्या खंकरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या घटनेतून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी राजकीय पदाची नव्हे, तर संवेदनशील मनाची गरज असते.