NANDED | देगलूर | युवा रक्षक वृत्तसेवा.
देगलूर (प्रतिनिधी): देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि दिवंगत आमदार, स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या समाधीस्थळी अंतापूर येथे १२ आॅगस्ट रोजी आदरांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
यावेळी, आमदार जितेश अंतापूरकर यांनी सकाळीच आपल्या वडिलांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित हजारो नागरिकांची आपुलकीने भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. रावसाहेब अंतापूरकर यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली. त्यांच्या कार्याची छाप आजही जनमानसावर किती गहरी आहे, याचे दर्शन या गर्दीतून घडले.
रावसाहेब अंतापूरकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात या भागाच्या विकासासाठी केलेले कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचे पुत्र आमदार जितेश अंतापूरकर पुढे चालवत असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. या जयंतीदिनी, रावसाहेब अंतापूरकर यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,समाजमाध्यम प्रतिनिधि,शैक्षणिक,सामाजिक,उद्योगिक क्षेञातील आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.