6.5 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रजासत्ताक दिनापूर्वी शालेय विद्यार्थ्यांंना गणवेश वाटप करा – संविधान दुगाने

इंडियन पँथर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांना निवेदन.

 

NANDED | बिलोली | युवा रक्षक वृत्तसेवा

बिलोली (प्रतिनिधी) :- अर्धे वर्ष संपत आले तरी बिलोली तालुक्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या गोर-गरीब शेतकरी , शेतमजुरांच्या मुलांना अद्याप पर्यंत गणवेश न मिळाल्याने स्वातंत्र्य दिन सुद्धा जुन्याच कपड्यांवर साजरा करावा लागला आहे. म्हणुन इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

समग्र शिक्षण व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतून शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश उपलब्ध देण्याबाबत ई-निवदा प्रक्रिया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आली. गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिला बचत गटामार्फत करण्यात येणार असुन कार्यारंभ आदेश ही निर्गमित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना गणवेश प्राप्त झालेले नसल्याने संविधान दुगाने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना १५ ऑगष्ट पूर्वी गणवेश मिळणे आवश्यक होते; परंतु विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने स्वातंत्र्यदिन शालेय गणवेशाविना साजरा करण्यात आला. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामदिन १७ सप्टेंबर पर्यंत तरी शालेय गणवेश विद्यार्थ्यांना मिळतील अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांना होती; परंतु अद्यापही गणवेश बिलोली तालुक्यातील एकाही शाळांना प्राप्त झाले नाही. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ हे अर्धे संपत येत आहे तरीही गणवेश मिळत नसल्याने पालक, विद्यार्थी शिक्षकांना दररोज विचारत आहेत. शालेय गणवेश कधी मिळणार आहेत; परंतु शिक्षक मुख्याध्यापक यांना माहिती नसल्याने शिक्षक मुख्याध्यापक अनुत्तरित आहेत. त्यामुळे त्वरित गणवेश वाटप करून सामाजिक दरी दूर करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती व स्थगिती रोखण्यात यावी अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान दुगाने यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांंना गणवेश मिळणार का? याकडे बिलोलीसह नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

ताज्या बातम्या