NANDED | अर्धापूर | युवा रक्षक वृत्तसेवा.
अर्धापूर (प्रतिनिधी):- अर्धापूर तालुक्यातील देळूब खुर्द गावाला पुराच्या पाण्याचा चहुबाजूंनी वेढा पडला होता. गावात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी तातडीने महसूल आणि आरोग्य विभागाला सूचना दिल्या. तसेच स्वतः घटनास्थळी पोहोचून महिलेला शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचवले.
रात्री ११ वाजता मदतीसाठी धावले देवदूत:
देळूब खुर्द येथे एका गर्भवती महिलेला तातडीने उपचारासाठी नांदेड येथील दवाखान्यात पोहोचवणे आवश्यक होते. मात्र, जोरदार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने देळूब खुर्द गावाला चारी बाजूंनी पुराचा प्रचंड वेढा पडला होता. रात्री ११ वाजता, सर्व मार्ग बंद असताना, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
प्रशासकीय टीमची तत्परता:
कोणत्याही सुरक्षेची पर्वा न करता, सचिन खल्लाळ स्वतः पुराच्या पाण्यातून मार्ग काढत देळूब खुर्द गावामध्ये पोहोचले. त्यांनी अडकलेल्या पेशंट महिलेला सोबत घेतले आणि पूरग्रस्त भागातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बाहेर काढले. मध्यरात्रीच्या वेळी, प्रशासकीय अधिकारी म्हणून केवळ आदेश न देता, प्रत्यक्ष मदतीसाठी मैदानात उतरल्यामुळे त्या महिलेला वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली. यावेळी तहसीलदार रेणूकदास देवणीकर, तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत देसाई, आरोग्य विभागाचे डॉ. सुनील गोपले व देळूब खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मानवतेचा महापूर:
डॉ. सचिन खल्लाळ यांच्या या धाडसी आणि मानवतावादी कार्यामुळे त्यांच्यावर परिसरातील नागरिक व प्रशासकीय वर्तुळातून ‘देवदूत अधिकारी’ म्हणून कौतुकाचा वर्षाव होत आहे.