“सामाजिक बांधिलकी म्हणून बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी दोन महिन्यांपासून आमचे प्रयत्न सुरु होते. मी स्वतः अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतांना पोलीस आणि नागरिक यांच्यामधील सुसंवाद वाढविण्यासाठी असे कार्यक्रम महत्वपूर्ण ठरतील.” -अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक नांदेड.
NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड : नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातून येथे सुरू झालेल्या रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी सुमारे साडेतीन हजार बेरोजगारांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली. रविवारीदेखील हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपून राज्यात महायुतीचे नवे सरकार आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात पहिला रोजगार मेळावा माजी मुख्यमंत्री, खा.अशोक चव्हाण व त्यांच्या आमदार कन्येच्या पुढाकारातून अर्धापूर येथे झाला होता. राजकीय पातळीवर त्याचा मोठा गाजावाजा झाला, तरी त्यातून जेमतेम हजार-बाराशे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने आपल्या स्तरावरून वेगवेगळ्या कंपन्या व आस्थापनांशी संपर्क साधत पोलीस मैदानावर वरील रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्याहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
या मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्णांपासून ते पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व त्यांच्या सहकार्यांनी केलेे होते. पोलीस दलाच्या आवाहनानुसार ९ हजारांहून अधिक बेरोजगारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. सुमारे ९७ वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी नांदेडमध्ये एका भव्य मंडपामध्ये एकत्र आले होते. मेळाव्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींमधून ३५०० जणांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यामध्ये तीन दिव्यांग उमेदवारांसह दोन मूकबधीर गरजुनांही नोकरीची संधी मिळाली.