- परभणी रेल्वे स्थानकाबाहेर १० डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता.
PARBHANI | युवा रक्षक वृत्तसेवा.
परभणी : संपूर्ण देशभर गाजत असलेल्या परभणी हिंसाचार प्रकरणातील पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्याकरीता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणीला येणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. परभणीतून राहुल गांधी न्यायाच्या लढाईचा एल्गार करतील.
परभणी रेल्वे स्थानकाबाहेर १० डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी नेतेमंडळी खवळून उठली आहेत. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीच मृत्यू होत असेल तर यापेक्षा असह्य काय असू शकते, अशा तीव्र प्रतिक्रिया देऊन आरोपींविरोधात कठोर शासन करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागलेली आहे. दोषी पोलिसांना देखील कठोर शिक्षेची मागणी समाजातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी सोमवारी परभणीला येत आहेत.