2.5 C
New York
Wednesday, March 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

व्यापाऱ्यांच्या हाकेला धावले लोकप्रतिनिधी; रमजानच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगरमधील दुकाने पुन्हा सुरू

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड :- पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे दिवस सुरू असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी आणि उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याने शिवाजीनगर भागातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी व्यापाऱ्यांच्या हाकेला धावून जात नगरसेवक अब्दुल गफ्फार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाशी संवाद साधून ही दुकाने पुन्हा सुरू करून दिली.

रमजानच्या खरेदीसाठी शिवाजीनगर भागात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू असतात. मात्र, रात्री पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ही दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. ऐन सिझनमध्ये दुकाने बंद झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी स्थानिक दुकानदारांनी तात्काळ नगरसेवक अब्दुल गफ्फार यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच नगरसेवक अब्दुल गफ्फार यांनी शिवाजीनगर भागात धाव घेतली. त्यांनी घटनास्थळावरूनच पोलीस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलीस निरीक्षक यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. रमजान महिन्याचे महत्त्व आणि व्यापाऱ्यांची अडचण याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांनी प्रशासनाला दुकाने सुरू ठेवण्याबाबत विनंती केली. लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक हस्तक्षेपानंतर प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यास संमती दिली, ज्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

यावेळी नगरसेवक अब्दुल गफ्फार यांच्यासोबत नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक मुन्नाभाई अब्बास, नगरसेवक साबेर भाई चाऊस, माजी नगरसेवक मुन्तजीब भाई यांच्यासह शिवाजीनगर भागातील असंख्य दुकानदार, व्यापारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय पेचप्रसंगात खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल शिवाजीनगर भागातील व्यापारी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी नगरसेवक अब्दुल गफ्फार व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांचे मनापासून आभार मानले आहेत. “जनतेच्या अडचणीत धावून येणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” अशा भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

 

Related Articles

ताज्या बातम्या