NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- गेल्या काही तासांपासून नांदेड शहरात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘बाबा पेट्रोल पंप’चे मालक चैतन्य बापू देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले असून, अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे विनंती केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पेट्रोल टंचाईचे संदेश पूर्णपणे निराधार आणि अप्रमाणित आहेत. प्रशासनाकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती किंवा सूचना देण्यात आलेली नाही. अशा संदेशांमुळे शहरात विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि गोंधळ होत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
चैतन्य बापू देशमुख यांनी स्पष्ट केले आहे की, चुकीचे संदेश पुढे (Forward) पाठवणे टाळावे. केवळ अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. “एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. शहरात इंधनाचा पुरेसा पुरवठा सुरळीत असून, विनाकारण साठवणूक करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही,” असे त्यांनी नमूद केले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी गोंधळ न घालता नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू ठेवावेत, असेही या माध्यमातून सांगण्यात आले आहे.



