NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी एक महिनाभराचा संपूर्ण पगार (अंदाजे एक लाख रुपये) आर्थिक मदत म्हणून देण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. सामाजिक बांधिलकीचे हे एक मोठे उदाहरण आहे.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत समाजाला आधार देण्यासाठी चिंचोलकर यांनी स्वतःहून हा पुढाकार घेतला आहे. ते स्वतः यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना या संकटाची जाणीव आणि वेदना जवळून ज्ञात आहेत.
सामाजिक बांधिलकीची भावना:
“सामाजिक बांधिलकी म्हणून माझा एका महिन्याचा पगार जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून देत आहे,” असे त्यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधी, स्वयंसेवी संस्था (NGOs) किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य त्या गरजूंपर्यंत पोहोचवावा, अशी विनंती त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.
पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने आपल्या बांधवांच्या मदतीसाठी उचललेले हे पाऊल इतरांसाठी एक आदर्श ठरले असून, संकटाच्या काळात समाजासोबत पोलीस यंत्रणा भक्कमपणे उभी आहे, हे यातून सिद्ध होते.