NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद (जि. नांदेड) :- धर्माबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांच्या जनावरांचे, पिकांचे, घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धर्माबाद शहरातील पानसरे चौकात भीक मांगो आंदोलन करत लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला.
या आंदोलनात शेतकऱ्यांनी हातात कटोरे घेऊन भीक मागितली आणि त्यातून जमा झालेला निधी पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या गाडीत डिझेल भरण्यासाठी वापरण्यात यावे अशे म्हटले आहे . शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आमच्या पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, पण अजूनपर्यंत कोणीही मदतीसाठी आले नाही. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात, पण प्रत्यक्षात काहीच मदत करत नाहीत.” या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, आता प्रशासन शेतकऱ्यांना काय मदत करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.