NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुंबई मोर्चाला नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिले आहे.
“मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा!” असा इशारा खासदार चव्हाण यांनी दिला आहे. “मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, आणि त्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलने झाली आहेत. तरीही आजपर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. या प्रलंबित मागणीसाठी मराठा समाज आज करोडोच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एकत्र येत आहे. याचा अर्थ, समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत,” असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या इतर मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात. अन्यथा, समाजाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. “मी स्वतः समाजाचा एक घटक म्हणून मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात सदैव सहभागी आहे,” असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
हा मोर्चा अंतरवाली सराटी येथून मुंबईला आज पोहचला असून, या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत आहे. खासदार चव्हाण यांच्या या पाठिंब्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.